गडचिरोली

निवडणूक कर्तव्यात केला कसूर, दोन कर्मचारी निलंबित

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने गोंदिया विधानसभा मतदारसंघ अंतर्गत जि.प. लघू पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अजय रहांगडाले व ग्रामपंचायत अधिकारी हेमंत वसंत लेंढे यांची स्थिर सर्वेक्षण पथक, पतंगा मैदान, आमगाव रोड, गोंदिया येथे नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांनी गैरहजर राहून त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर सोमवारी (दि. ११) जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया यांनी रविवारी (दि. १०) रात्री ९:४५ च्या सुमारास स्थिर सर्वेक्षण पथक, पतंगा मैदान, आमगाव रोड, गोंदिया येथे भेट दिली असता अजय रहांगडाले, उपविभाग गोंदिया पथक क्र. २ (नियुक्तीच्या वेळी दुपारी २ ते रात्री १० पर्यंत) आणि हेमंत वसंत लेंढे, पथक क्र. ३ (नियुक्तीच्या वेळी १० ते सकाळी ६ पर्यंत) हे रात्री ११ वाजेपर्यंत आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनधिकृत गैरहजर आढळले. संबंधितांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा दाखवून आपल्या कर्तव्यात गंभीर स्वरुपाचे कसूर केल्याने संबंधिताविरुद्ध तत्काळ प्रभावाने निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली कारवाई
निवडणूक कामकाज कर्तव्याच्या ठिकाणी अनधिकृत गैरहजर आढळून आल्याने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केल्याने कार्यवाहीस पात्र ठरत असल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ३ मधील तरतुदीनुसार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी अजय रहांगडाले व हेमंत लेंढे यांना निलंबित केले आहे. त्यामुळे निवडणूक कामकाज कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनधिकृत गैरहजर राहू नये अशी सूचना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *