राष्ट्रीय

भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा

बांगलादेशमध्ये जातीय तेढ सातत्याने वाढत आहे. सत्तापालटानंतर मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारमध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये भाजपे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी मोठी घोषणा केली आहे. हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर बंगालमधील पेट्रापोलमध्ये भारत-बांगलादेश सीमेवर आंदोलन करण्यात येईल, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, न्यूटनच्या थर्ड लॉ प्रमाणे कारवाई केली जाईल, असा इशाराही सुवेंदू अधिकारी यांनी दिला आहे.

सुवेंदू अधिकारी म्हणाले की, बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांची प्रतिक्रिया न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमानुसार असेल, ज्यामध्ये प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. दरम्यान, नुकतेच हिफाजत-ए-इस्लाम या बांगलादेशातील चितगाव येथील इस्लामिक संघटनेने इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना आणि इस्कॉनवर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. याबाबत भारताने तीव्र निषेधही व्यक्त केला होता.

भाजप नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, “बांगलादेशने समजून घेतले पाहिजे की अल्पसंख्याकांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या हक्कांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. आम्ही बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारला इशारा देऊ इच्छितो की हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत तर आम्ही पेट्रापोल सीमेवर आंदोलन करू. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध पाहता भारत बांगलादेशी हिंदूंच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करू शकत नाही.”

बांगलादेशातील ८ टक्के हिंदूंना सातत्याने लक्ष्य केलं जातंय
बांगलादेशच्या १७० दशलक्ष लोकसंख्येपैकी ८ टक्के हिंदू हे शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाशी संबंधित आहेत. गेल्या महिन्यात आरक्षण विरोधी आंदोलक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर पक्षाला विरोधाचा सामना करावा लागला. ५ ऑगस्टनंतर अनेक आठवडे सुरू असलेल्या हिंसक घटनांमध्ये ६०० हून अधिक लोक मरण पावले.विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीमुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पदावरून हटवण्यात आले. यानंतर हिंसक आंदोलकांनी हिंदूंवर हल्ला केला. त्यांची घरे, मंदिरे जाळण्यात आली. त्यावेळी अनेक लोकांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *